CM Fellowship Program: महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांसाठी एक आकर्षक आणि प्रेरणादायी संधी उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली “मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025-26” पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये राज्यभरातून 60 फेलोंची निवड केली जाणार असून, त्यांना प्रशासनात सहभागी होऊन प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. यामाध्यमातून तरुणांना शासकीय यंत्रणेबाबत समज वाढवता येणार असून, समाजासाठी सकारात्मक योगदान देता येणार आहे.
मासिक ₹61,500 मानधन
या योजनेत सहभागी फेलोंना दरमहा ₹56,100 चे मानधन आणि ₹5,400 प्रवास भत्ता, अशा एकूण ₹61,500 चे मासिक स्टायपेंड दिले जाणार आहे. फेलोंची नियुक्ती 12 महिन्यांसाठी केली जाईल. यामध्ये कोणतीही वाढ किंवा पुन्हा नियुक्तीचा पर्याय नाही. प्रत्येक फेलोची नियुक्ती दोन किंवा तीन जणांच्या गटात करण्यात येईल, आणि ते संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करतील.
फेलोंच्या निवडीचे काय आहेत निकष ?
फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 60% गुणांसह) असावी आणि किमान एका वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. तसेच, मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक हाताळणी व इंटरनेटचे ज्ञानही अपेक्षित आहे.
अनुभव : किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
अर्जदाराचे वय अर्जाच्या अंतिम तारखेस 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून ₹500 शुल्क भरावे लागेल.
फेलोंच्या निवड कशी केली जाईल?
उमेदवारांना ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी द्यावी लागेल. फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शैक्षणिक प्रशिक्षण, जे आयआयटी मुंबईच्या सहकार्याने राबवले जाईल. फेलोंना सार्वजनिक धोरण या विषयावर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम दिला जाईल. या अभ्यासक्रमात ऑनलाईन व ऑफलाईन व्याख्याने, फिल्ड वर्क, सामाजिक संस्थांना भेटी आणि सत्रांद्वारे समृद्ध अनुभव दिला जाईल. या सर्व उपक्रमांत सहभाग अनिवार्य असून, त्यानंतरच शासनाकडून प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
एकंदरीत, ही योजना केवळ उच्च मानधन देणारी नोकरी नसून, ती तरुण नेतृत्वाला घडवणारी, प्रशासनाचे ज्ञान देणारी आणि धोरणनिर्मितीत प्रत्यक्ष सहभागी होण्याची एक अमूल्य संधी आहे. इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करून या फेलोशिपचा लाभ घ्यावा.
Disclaimer
हा लेख फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. यामध्ये दिलेली माहिती सरकारी विधाने आणि उपलब्ध तथ्यांवर आधारित आहे. कोणत्याही अधिकृत निर्णयासाठी किंवा धोरणासाठी संबंधित सरकारी विभागाची अधिकृत अधिसूचना किंवा घोषणा पहा.